Take a fresh look at your lifestyle.

बायोगॅस उभारणीसाठी आवश्‍यक गोष्टी कोणत्या? वाचा!

0

बायोगॅस संयंत्रासाठी प्रामुख्याने काय लागतं? तर जनावरांचे शेण, डुकरे-कोंबड्याची विष्ठा, जनावरांचे मूत्र, जर शौचालय जोडले असेल तर मानवी विष्ठा, स्वयंपाक घरातील टाकाऊ पदार्थ, वाया गेलेल्या भाजीपाल्यांचे बारीक तुकडे आदी गोष्टी लागतात.

जर बायोगॅस संयंत्रामध्ये ओले गवत, हिरवा पाल्याचा वापर करणार असाल तर गॅस प्लॅंटमध्ये आम्लता वाढण्याचा धोका जास्त असतो, म्हणून असे पदार्थ किमान5 दिवस चांगले कुजवून नंतर संयंत्रात सोडा. जनता प्रकारचा बायोगॅस असणाऱ्या व्यक्तीच्या संयंत्राचे इनलेट (पूरक कुंडी) मोठे असते. या संयंत्रामध्ये शेणराडा किंवा इतर कुजणारे पदार्थ पाण्यासोबत त्याच्या विशिष्ट प्रमाणात घातले असता त्यांची नैसर्गिक कुजण्याची प्रक्रिया हळू-हळू सुरू होते. ही प्रक्रिया हवेच्या अनुपस्थितीत होते व निर्वातीय किटाणूमुळे ती अगदी सुलभरीत्या होते. यातून तयार होणारा गॅस वरच्या डोममध्ये साठविला जातो. यामध्ये मिथेन वायू 50 ते 75 टक्के, कार्बनडायऑक्‍साईड 25 ते 50 टक्के तसेच हायड्रोजन सल्फाईड, हायड्रोजनचे प्रमाण एक टक्‍क्‍यापर्यंत असते.

संयंत्रातील पदार्थ कुजल्यानंतर त्यातून तयार होणारी स्लरी गॅसच्या दाबामुळे बाहेर पडत असते. स्लरी हे अतिशय उच्च प्रतीचे सेंद्रिय खत आहे. बायोगॅस संयंत्राला शौचालय जोडलेले असेल तर ते स्वच्छ करण्यासाठी फिनाईल, डिटर्जंट साबणाचा वापर करू नका. कारण यामुळे निर्वातीय किटाणू मारले जाऊ शकतात, तसेच पदार्थ कुजवण्याची प्रक्रिया देखील बंद पडू शकते.

बायोगॅस स्लरीचे खत : हे खत द्रवरूप आणि घनरूपात (वाळवून) अशा दोन प्रकारे वापरता येते. या खतामुळे जमिनीची सुपीकता वाढण्यास मदत होते. तसेच मुरून पिकास हे उपयुक्त ठरते. जर गोबरगॅस व लाभार्थीचे शेत यामध्ये अंतर जास्त असेल किंवा वाहतूक करण्यास अडचण असल्यास द्रवरूपातील खत शेतामध्ये नेणे अडचणीचे होऊ शकते. अशावेळी गॅसप्लॅंटजवळ खत साठविण्यासाठी खड्डा तयार करा. खत साठविण्यासाठी आऊटलेटला लागून (रेचक कुंडी) दोन खड्डे करा. एक खड्डा भरल्यानंतर दुसऱ्या खड्ड्यात स्लरी सोडा. हे खत वाळल्यानंतर ते हंगामानुसार शेतात वापरा.

बायोगॅससाठी जागा कशी असावी? : बायोगॅससाठी घराजवळील उंच, कोरडी, मोकळी व बराच वेळ सूर्यप्रकाश मिळणारी जागा निवडा. घराजवळ अगर गोठ्याजवळ शक्‍यतो जागा असू द्या. जमिनीखाली पाण्याची पातळी दोन मीटरपेक्षा खाली असावी. तुम्ही निवडलेल्या जागेजवळ झाडे, पाण्याची विहीर, पाण्याचा हातपंप नसावा. बायोगॅस बांधकामास मंजुरी मिळाल्यानंतर आपल्याकडे असलेली जनावरे व कुटुंबातील व्यक्तींची संख्या विचारात घेऊन क्षमतानिहाय बायोगॅस संयंत्राचे आकारमान ठरवून बांधकाम करा.

बायोगॅसचे प्रकार किती? :
● बायोगॅस मॉडेलचे बांधकाम करताना केंद्र शासनाने मान्यता दिल्याप्रमाणे करा. तुमच्या बांधकामावरून तरंगती गॅस टाकी संयंत्र आणि स्थिर घुमट संयंत्र असे दोन प्रकार पडतात.
● बांधकामाचे नियोजन करताना स्थानिक जमीन व हवामानाचा प्रकार विचारात घ्या.
● ज्या भागात मुरूम व तांबूस मातीचा प्रकार असेल त्या ठिकाणी दीनबंधू स्थिर घुमट संयंत्र प्रकारचे बांधकाम करा.
● ज्या ठिकाणी काळी माती किंवा फुगणारी जमीन असेलअशा ठिकाणी फेरोसिमेंट, प्री-फॅब्रिकेटेड फेरोसिमेंट या प्रकारचे बायोगॅस बांधा.
● दीनबंधू स्थिर घुमट संयंत्र प्रकारचा बायोगॅस अगदी कमी खर्चात होणारा आहे. सर्वसामान्य लाभार्थीस तो परवडणारा आहे. मात्र याचे बांधकाम प्रशिक्षित व कसबी गवंड्याकडूनच करून घ्यावे लागते.
● दुसरीकडे तरंगत्या टाकीचा बायोगॅस बांधकामास खर्च अधिक येतो.

बायोगॅससाठी किती अनुदान मिळते? : जर ग्रामीण भागात बायोगॅसचे बांधकाम केले तर केंद्र शासनाच्या नवीन आणि नवीकरणीय मंत्रालयामार्फत अनुदान दिले जाते. बांधकामासाठी लाभार्थी सक्षम नसेल तर त्यासाठी राष्ट्रीयीकृत व सहकारी बॅंकांकडून कर्जपुरवठा केला जातो. अनुदानाची रक्कम लाभार्थीच्या कर्जखाती जमा होते.

बायोगॅसचा स्वयंपाकाव्यतिरिक्त इतर कारणांसाठी वापर केले तर (उदा. – इतर ऊर्जा साधनांचा वापर कमी करून डिझेल बचत करणे, जनरेटर, रेफ्रिजरेटर यांच्या वापरासाठी बायोगॅसचा वापर केल्यास) प्रति संयंत्रास 5000 रुपये अनुदान दिले जाते. ज्या प्रकारचा बायोगॅस बांधायचा आहे, त्याप्रमाणे खर्च लक्षात घ्यावा लागेल. राष्ट्रीय बायोगॅस विकास योजनेच्या अंमलबजावणीमध्ये काही स्वयंसेवी संस्थांचा सहभाग असतो. बायोगॅस योजनेतील अद्ययावत माहितीसाठी पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाशी संपर्क साधा.

अशी असते बायोगॅस प्रकिया :
● बायोगॅस संयंत्र म्हणजे सेंद्रिय पदार्थाचे जिवाणूद्वारे हवाविरहित अवस्थेत विघटनानंतर निर्माण होणारा वायू साठविण्यासाठी तयार करण्यात आलेले साधन. यात मिथेन व कार्बन-डाय- ऑक्‍साईड आदी वायू तयार होतात.
● मिथेन वायू ज्वलनास मदत करतो. बायोमास गॅसिफायरमधून तयार होणारा प्रोड्युसर गॅस पाणी उपसणे, वीजनिर्मिती तसेच स्वयंपाकासाठी देखील वापरला जातो.
● बायोगॅस वायूमध्ये मिथेन 55 ते 70 टक्के, कार्बनडायऑक्‍साईड 30 ते 40 टक्के अल्प प्रमाणात नायट्रोजन व हायड्रोजन सल्फाईड आदी वायूंचा समावेश असतो. यात असणारा मिथेन वायू ज्वलनशील आहे.
● अगदी कोणत्याही प्रकारचे टाकाऊ पदार्थ, जे कुजतात त्यांच्यापासून बायोगॅस तयार होत असतो. उदा. शेण, घरातील खरकटे अन्न, निरुपयोगी भाजीपाला, पशुविष्ठा, मानवी विष्ठा सारख्या पदार्थांचे मिश्रण पाण्याबरोबर करून बायोगॅस संयंत्राच्या प्रवेश कक्षामध्ये पाचक यंत्रामध्ये सोडले जाते.
● या पाचक यंत्रामध्ये कालांतराने कार्यक्षम जिवाणू तयार होतात. मग ॲसिटिक ॲसिड तयार होऊन 5 विभिन्न प्रकारचे जिवाणू तयार होऊन मिथेन व कार्बनडायऑक्‍साईड सारखे वायू तयार होतात.
● तसेच बांधकामाचा खर्च संयंत्राच्या आकारावर अवलंबून असतो. दोन घनमीटर क्षमतेचा दीनबंधू प्रकाराचे संयंत्र बांधण्याचा खर्च अंदाजे 40 ते 45 हजार रुपये येऊ शकतो.
● तरंगत्या टाकीच्या बायोगॅस (फ्लोरिंग डोम) संयंत्राला येणारा खर्चही आकारमानावर अवलंबून असतो. दोन घनमीटर क्षमतेचा खादी ग्रामोद्योग प्रकारच्या संयंत्रासाठी साधारणपणे 45 ते 50 हजार रुपये खर्च होतो.
● तुमच्या बायोगॅस संयंत्राची रचना करताना त्यामध्ये हवाबंद, बंदिस्त पोकळी तयार करा. त्या पोकळीत सेंद्रिय पदार्थ टाकण्याची सोय करा. तसेच सेंद्रिय पदार्थांपासून तयार होणारा गॅस व खत बाहेर येण्याची व साठविण्याची सोय करा.

शेणावरील बायोगॅसच्या उभारणीसाठी आवश्‍यक गोष्टी :
● एक घन मी. गॅसनिर्मितीसाठी अंदाजे 25 किलो शेण लागते.
● बायोमास गॅसिफायरमधून तयार होणारा प्रोड्युसर गॅस पाणी उपसणे, वीजनिर्मिती तसेच काही वेळा स्वयंपाकासाठी देखील वापरता येतो.
● बायोमास गॅसिफायर संयंत्र विविध कार्यक्षमतेमध्ये उपलब्ध आहे. तुमच्या गरजेप्रमाणे तुम्ही त्यांचा वापर करू शकता. त्यांची किंमत क्षमतेनुसार वेगवेगळी असते.

शेती विषयक बातम्या, शासकीय योजना, महत्वाची माहिती मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप आजच Join करा : https://instabio.cc/krushidootgroup

Leave A Reply

Your email address will not be published.

रिकाम्या पोटी Black Tea पिण्याचे फायदे #blacktea YouTube चे नवीन CEO नील मोहन कोण आहेत? Know About Neal Mohan Drinking water in Morning : रिकाम्या पोटी पाणी पिण्याचे अनोखे फायदे Diabetes Diet : या भाज्या खा, मधुमेह नियंत्रणात राहील #Diabetes #webstory #krushidoot #health tips #health Winter Tips & Diet : हिवाळ्यात फिट राहण्यासाठी आहारात हे बदल करा Winter diet winter health tips health tips health in winter winter health issues