Take a fresh look at your lifestyle.

ढगफुटी म्हणजे नक्की काय होते? जाणून घ्या सविस्तर!

0

राज्यात गेल्या काही दिवसांपासून ज्या काही घटना घडत आहेत. ते पाहता अनेक ठिकाणी ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याचे चित्र आहे. चला तर आजच्या लेखात आपण ढगफुटी म्हणजे नेमके काय? याची माहिती पाहूयात…

गरम हवा व आद्रता यामुळे ढगांमधील पाण्याचे प्रमाण वाढते. पाण्याचे अब्जावधी थेंब ढगांमध्ये विखुरले जातात. यातूनच पुढे जोरदार पाऊस पडतो. मात्र कधी-कधी ढगांमध्ये वेगाने वर चढणारा हवेचा स्तंभ देखील निर्माण होतो. याला अपड्राफ्टस् असे म्हणतात. तो पाण्याच्या थेंबाना घेऊन वरवर चढत निघतो.

याबरोबर वेगाने वर चढताना पाण्याचे थेंब चांगले गरगरीत होऊ लागतात. अनेकदा वर चढणाऱ्या हवेच्या स्तंभात अतिशय गतिमान असे वारे निर्माण होतात. ढगातच छोटी-छोटी वादळे उठतात. यात पाण्याचे थेंब सापडतात. वादळात वेगाने गिरक्या घेत असताना ते एकमेकांवर आदळतात आणि एकमेकांमध्ये मिसळून आणखी मोठे होत जातात. यानंतर हवेचा स्तंभ आता पाण्याच्या मोठ-मोठ्या थेंबाना घेऊन वर-वर चढू लागतो.

दरम्यान हवेच्या स्तंभाची जेवढी ताकद अधिक तितका तो वर चढतो आणि कालांतराने या चक्राचा पाळणा खाली येऊ लागतो. या स्तंभाने तोलून धरलेले पाण्याचे मोठे थेंब अतिशय वेगाने खाली झेपावतात. यावेळी त्यांना स्तंभातील ऊर्जा देखील मिळालेली असते. अतिशय सुसाट वेगाने ते जमिनीकडे येतात. हवेचा स्तंभ आता जमिनीच्या दिशेने यायला तयार होतो. याला डाऊनड्राफ्ट असे म्हणतात. थेंबाचा वेग साधारणपणे ताशी १२ किमी असतो. बघता-बघता तो ताशी ८० ते ९० किमीपर्यंत देखील पोहोचतो.

ढगफुटीमुळे नक्की काय होते? : लक्षात घ्या, ढग जरी मोठा असला तरी त्याचा विस्तार जास्त नसतो. यामुळे जमिनीवरील लहानशा भागात पाण्याचा जणू स्तंभच कोसळतो. मोठे थेंब व प्रचंड वेग यामुळे जमीन व त्यावरील सर्व काही अक्षरशः झोडपून निघते. अवघ्या काही मिनिटातच प्रचंड पाणी ओतले गेल्याने पाणी शोषून घेण्याचे जमिनीचे काम थांबते आणि पुरासारखी स्थिती निर्माण होते.

डाऊनड्राफ्ट अधिक धोकादायक : हवेचा स्तंभ जेव्हा वेगाने जमिनीवर आदळतो तेव्हा ती ऊर्जा वेगाने इतरत्र फेकली जात असते. यामुळे पाण्याबरोबर चारी दिशेने वाऱ्याची वावटळ उठलेली पहायला मिळते. हे वारे कधी ताशीदीडशे ते दोनशे किमी इतका वेग घेत असतात. मात्र या वावटळीमुळे लहान झाडे एका रेषेत झोपल्यासारखी मोडून पडतात. हवेचे हे स्तंभ विमानांसाठी अधिक धोकादायक असतात.

ढगफुटी आणि एक अनोखी घटना : ढगफुटीच्या वेळी घडणाऱ्या एक अनोख्या घटनेची मौज घेण्याचे भान कुणालाही नसते. ढगफुटीच्या अगोदर हवामान अर्थातच पावसाळी असते. काळोखी दाटत जाते. मात्र पाऊस पडताना हे प्रमाण एकदम कमी होते. कधी-कधी जणू सूर्यप्रकाशात पाऊस पडल्यासारखा दिसतो. याचे कारण म्हणजे पावसाचे भलेमोठे थेंब होय. हे थेंब आरशाप्रमाणे काम करतात व प्रकाश परावर्तित करतात. यामुळे नेहमीपेक्षा जास्त प्रकाश दिसत असतो.

———————————————————–

अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण पोस्ट्स साठी आमचे फेसबुक पेज लाईक करा : https://www.facebook.com/teamkrushidoot/

———————————————————–

Leave A Reply

Your email address will not be published.