Take a fresh look at your lifestyle.

खरीप पिकांतील पाणी व्यवस्थापन

0

पिकांच्या अधिक उत्पादकतेसाठी जमीनीची योग्य निवड, सुर्यप्रकाश, वेळेवर मशागत, आधिक उत्पादन देणाऱ्या जाती, खते व पाणी या गोष्टी प्रामुख्याने विचारात घेतल्या पाहिजे. प्रत्येक पिकांची पाण्याची गरज ही त्याच्या वाढीनुसार व ठराविक असते. ती सर्वसाधारणपणे पीक, जमिनीचा प्रकार, पिकांच्या वाढीची अवस्था व हंगाम या प्रमाणे बदलत असते. खरीप पिकांमध्ये वाढीची अवस्था व हंगाम या प्रमाणे बदलत असते. खरीप पिकांमध्ये वारंवार पाऊस पडत असल्यामुळे तणांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होतो. त्यामुळे खतांचा प्रतिसादही मिळत नाही आणि जमिनीतील उपलब्ध ओलावा तण खाऊन जाते. त्यामुळे धान्य उत्पादनात घट येते. यासाठी खरीपामध्ये मशागतीद्वारा अथवा तणनाशकांचा मर्यादीत वापर करुन तण नियंत्रणात ठेवता येते.


खरीपामध्ये आंतरपिक पध्दतीचा अवलंब जमिनीतील अन्नद्रव्य व ओलावा व्यवस्थापनासंबंधीत अत्यंत महत्वपुर्ण आहे. वेगवेगेळी देान पिके, ज्यांचा कालावधी, मुळाची वाढ, शाकीय वाढ भिन्न प्रकारची आहे, अशी पिके आंतरपिके म्हणुन घेतल्यास जमिनीतील वेगवेगळ्या थरातील अन्नद्रव्ये व ओलावा यांचा कार्यक्षम वापर करुन पीक उत्पादनात शाश्वती आणता येते. यासाठी महाराष्ट्रामध्ये तुर+बाजरी (१:२), तुर+मुग/उडीद/चवळी (१:३), तुर + सुर्यफुल (१:२), तुर + सोयाबीन (१:३) कापुस + ज्वारी (१:२), कापुस + मुग / उदीड (१:३) इत्यादी आंतर पिकांची शिफारस करण्यात आली आहे. आंतर पीक पध्दतीमध्ये कमी कालावधीचे पिक काढल्यानंतर मुख्य पिंकांत बळीराम नांगराने सरी वरंबा काढल्यास दुहेरी फायदा होतो. त्यामुळे पिकांच्या मुळास मातीची भर मिळते आणि कमी पावसात सरीमध्ये पाणी साठवुन उत्कृष्ठपणे जलसंधारण करता येते व त्याचा धान्य उत्पादन वाढीस हातभार लागतो. जास्त पाऊस झाल्यास याच सरयांचा निच-यासाठी उपयोग होऊन पिकांमध्ये अतिरीक्त पाणी साठण्याचा धोका टळतो आणि मुळाच्या वाढीस पोषक वातावरण मिळते.

पीकवाढीनुसार पाण्याचे नियोजन :


अ) वनस्पती पाण्याचे शोषण मुळाद्वारे करतात. त्यामुळे जमीन ओलवताना मुळाच्या वाढीप्रमाणे/ खोलीप्रमाणे तेवढ्याच खोलीचे पाणी पिकास देणे फायद्याचे असते.
ब) मुळांच्या वाढीपेक्षा जास्त खोलवर दिलेले पाणी हे पिकांच्या दृष्टीने अनुत्पादक, मुळांस हानिकारक आणि जमिनीच्या दृष्टीने अपायकारक ठरते.
क) पिकांना सुरुवातीच्या अवस्थेमध्ये कमी खोलीचे पाणी व नंतर त्यांच्या वाढीनुसार पाण्याची खोली वाढवावी या पध्दतीमुळे पाण्याची मोठी बचत होते.
ड) सर्वसाधारणपणे रोप अवस्थेमध्ये सर्वच पिकांना पाण्याची गरज कमी असते व पुढे पुढे ती हळु हळु वाढत जोते. पाणी देण्याची वेळ ठरविताना जमिनीतील उपलब्ध ओलावा आणि पिकांच्या पाण्यास संवेदनशील अवस्था यांचा विचार करावा.

जमिनीतील ओलावा खालील गोष्टींवर अवलंबुन असतो :
अ) जमीनीची खोली
ब) मातीतील चिकणकणांचे प्रमाण
क) सेंद्रिय पदार्थांचे प्रमाण
ड) विम्लयुक्त चोपणपणा

महाराष्ट्राच्या कोरडवाहु क्षेत्रात एकुण क्षेत्राच्या ३० टक्के जमिनी उथळ, ४७ टक्के जमिनी मध्यम खोल तर, २३ टक्के जमिनी खोल आहेत. रब्बी हंगामात मध्यम ते खोल जमिनीमध्ये ओलावा साठविण्याचे प्रमाणा १०० ते २८० मि.मी. पर्यंत असल्याने ज्वारी, करडई, सुर्यफुल, हरभरा या पिकांचे नियोजन करता येते. मध्यम खोल काळ्या जमिनीमध्ये चिकणकणांचे प्रमाण ३५ ते ६५ टक्के इतके असते. त्यामुळे पडणारे पावसाचे पाणी जमिनीत मुरत नाही आणि ओलाव्याची साठवण सुध्दा कमी होते. जमिनीत सेंद्रीय पदार्थांचे प्रमाण १ टक्यांपेक्षा जास्त असल्यास पाऊस मुरविण्याची क्षमता तसेच जमिनीची जलधारण शक्ती वाढते. त्यासाठी हेक्टरी ५ ते ६ टन शेणखत वापरल्याने पाऊस मुरण्याची क्षमता चौपटीने वाढते.

भुईमुग :
खरीप भुईमुगास फुले येण्याची अवस्था (पेरणीनंतर २० ते ३० दिवस, आ-या सुटण्याची अवस्था (४० ते ४५ दिवस ) आणि शेंगा पोसण्याची अवस्था (६५ ते ७० दिवस ) या अवस्थांमध्ये पावसाने ताण दिल्यास संरक्षित पाण्याची पाळी द्यावी.

सोयाबीन :
पिकाला फांद्या फुटताना (पेरणीनंतर ३० ते ३५ दिवसांनी), फुलो-यात असतांना (पेरणीनंतर ४५ ते ५० दिवसांनी ) पावसाने ताण दिल्यास पाण्याच्या पाळ्या द्याव्यात.

खरीप ज्वारी :
ज्वारीच्या पिकास, पिकाचा जोमदार वाढीचा काळ (२८ ते ३० दिवस), पीक पोटरीत येण्याचा काळ (५० ते ७५ दिवस ), फुलो-यात येण्याचा काळ (८० ते ९० दिवस ) व दाणे भरण्याचा काळ (९५ ते १०० दिवस ) या चार अवस्थेत जरुरीप्रमाणे शक्य झाल्यास पाणी द्यावे.

मका :
खरीपामध्ये मका या पिकास जरुरीप्रमाणे त्यांच्या अवस्थेनुसार पाणी द्यावे, पाणी देण्यासाठी या पिकांच्या संवेदनशील अवस्था, वाढीची अवस्था (२० ते ४० दिवस ), फुलोरा अवस्था (४० ते ६० दिवस ) व कणसांमध्ये दाणे भरण्याची अवस्था (७० ते ८० दिवस ) या अवस्थेत जरुरीप्रमाणे शक्य झाल्यास पाणी द्यावे.

सारांश :
कोरडवाहु विभागात खरीप व रब्बी हंगामामध्ये विविध शेती मशागतीद्वारे व यांत्रिकीपध्दतीने मृदा व जलसंधारणाद्वारे खुप कमी होऊन जमिनीत ओलावा साठविला तर कोरडवाहु पिकांचे उत्पादन चांगल्या पध्दतीने घेता येईल. तसेच खरीप हंगामामध्ये पाऊस पडत असल्यामुळे पिकांना पाणी देण्याची व्यवस्था त्यांच्या संवेदनशील अवस्थांनुसार करावी, जमीनीतील ओलावा टिकवण्यासाठी जमीन सपाटीकरण , सपाट सरीवरंबे, समपातळीत मशागत, जैविक बांध, आंतर मशागत व आच्छादनांचा वापर करावा. आपतकालीन व्यवस्थापनांत फटीच्या कोळप्याने कोळपणी, पिक वाणांचे नियोजन, पानाद्वारे होणारे बाष्पीभवन कमी करण्यासाठी केओलीन, पांढरा रंग अथवा खडु पावडरचा फवारा पानांवर करावा.

प्रा. सुमीत अ. शेटे
सहा. प्रा. मृदाविज्ञान व कृषि रसायनशास्त्र विभाग,
श्र. कृषि महाविदयालय, मालदाड, ता. संगमनेर,
मो. 9689599948

प्रा. प्रांजल जा. शेडगे
सहा. प्रा. कृषि वनस्पती शास्त्र विभाग,
श्र. कृषि महाविदयालय, मालदाड, ता. संगमनेर,
मो. 9561204632

Leave A Reply

Your email address will not be published.

रिकाम्या पोटी Black Tea पिण्याचे फायदे #blacktea YouTube चे नवीन CEO नील मोहन कोण आहेत? Know About Neal Mohan Drinking water in Morning : रिकाम्या पोटी पाणी पिण्याचे अनोखे फायदे Diabetes Diet : या भाज्या खा, मधुमेह नियंत्रणात राहील #Diabetes #webstory #krushidoot #health tips #health Winter Tips & Diet : हिवाळ्यात फिट राहण्यासाठी आहारात हे बदल करा Winter diet winter health tips health tips health in winter winter health issues